
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : कोणतीही शस्त्रक्रियेची चीर, भूल अथवा छाती न उघडता ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) या आधुनिक पद्धतीद्वारे ७५ वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या झडपेचे कार्य पूर्ववत करण्यात लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर होता आणि वैद्यकीय पथकाशी संवादही साधत होता, अशी माहिती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुजीथ कुमार आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख डॉ. संतोष साहू उपस्थित होते.
डॉ. इंगोले यांनी सांगितले की, संबंधित रुग्णाचा हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास गुंतागुंतीचा होता. १५ वर्षांपूर्वी त्यांच्यावर कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याचवेळी ‘एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस’ अर्थात हृदयाची मुख्य झडप अरुंद झाल्याचे निदान झाले होते. चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे त्यांना वारंवार जाणवत होती.

वाढते वय आणि यापूर्वी झालेल्या दोन हृदयविकार उपचार प्रक्रियांमुळे पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेद्वारे झडप बदलणे अत्यंत जोखमीचे होते. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या तज्ज्ञ पथकाने ‘टीएव्हीआर’ ही कमीत कमी आक्रमक आणि शस्त्रक्रियाविरहित पद्धत निवडली.
या प्रक्रियेत मांडीतील रक्तवाहिनीत सुईद्वारे छोटे छिद्र करून हृदयापर्यंत पोहोचले जाते. विशेष कॅथेटरच्या साहाय्याने नवीन झडप हृदयापर्यंत नेऊन ती खराब झालेल्या झडपेच्या जागी अचूकपणे बसविली जाते. यासाठी छातीवर कोणताही चीरा देण्याची किंवा छाती उघडण्याची आवश्यकता नसते.

डॉ. इंगोले म्हणाले, ‘‘टीएव्हीआर हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील महत्त्वपूर्ण यश असून पारंपरिक शस्त्रक्रियेचा धोका अधिक असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत प्रभावी ठरत आहे. एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असलेल्या रुग्णांसाठी यामुळे उपचारांच्या नव्या शक्यता उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेनंतर रुग्ण साधारणतः ४८ तासांत किंवा तीन ते पाच दिवसांत घरी जाऊ शकतात.’’

डॉ. सुजीथ कुमार यांनी सांगितले की, रुग्णाला प्रक्रियेच्या आदल्या दिवशी दाखल करण्यात आले होते. प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना चालण्यास सांगण्यात आले आणि चौथ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एका महिन्यानंतरच्या तपासणीत रुग्णाची प्रकृती उत्तम असून कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याचे आढळले.

रुग्णाने सांगितले की, ‘‘आम्ही उपचारांसाठी विविध पर्यायांचा शोध घेत असताना डॉ. इंगोले यांची भेट झाली. त्यांनी टीएव्हीआर प्रक्रिया माझ्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितले. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचे सहकार्यही अत्यंत चांगले होते.’’
विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय सातत्याने रुग्णसेवा देत आहे. ३०० हून अधिक खाटांचे हे सुपर स्पेशालिटी टर्शियरी केअर रुग्णालय असून हृदयरोग, हृदयशस्त्रक्रिया तसेच विविध वैद्यकीय शाखांतील अत्याधुनिक सेवा येथे उपलब्ध आहेत.

ही प्रक्रिया डॉ. सूरज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड आणि डॉ. दीपक कवडे, सहाय्यक डॉ. विष्णू व डॉ. अनघा, तंत्रज्ञ मनोज आणि कल्याण तसेच स्टाफ नर्स अमित आणि मीना यांनी या प्रक्रियेत सहकार्य केले.
बापुराव चौधरी उपसंपादक