सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच सामाजिक क्षेत्रातील सक्रिय योगदानाबद्दल प्राध्यापक डॉ. बाळासाहेब सोनवणे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

प्राईम टायकून मीडिया यांच्या वतीने कोथरूड येथील एम.ई.एस. ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्राईम टायकून मीडियाचे सीईओ निलेश साबे बाबासाहेब दिघे, येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथशेठ येवले तसेच जयश्रीताई तायडे यांच्या शुभहस्ते डॉ.बाळासाहेब सोनवणे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन सेवा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन डॉ. बाळासाहेब सोनवणे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली. “हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा, सहकाऱ्यांचा आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यातही शिक्षण, सामाजिक कार्य आणि युवा पिढीच्या घडणीसाठी अधिक जोमाने कार्य करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे, प्राचार्य डॉ. विलास कांबळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ, प्राचार्य भास्कर शेळके, प्राचार्य डॉ. अनिल अडसुळे, उपजिल्हाधिकारी अविनाश कोष्टी, प्रशांत ठाकरे, शरद मंडलिक, तहसीलदार सुनील चंदनशिवे तसेच आदर्श उद्योजक मनोहर देशमुख यांच्यासह प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक व उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. बाळासाहेब सोनवणे यांचे अभिनंदन केले.
बापुराव चौधरी उपसंपादक