सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपो येथे असलेल्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन नियंत्रण कक्षाला दुपारी १.२३ वाजता ६५८, बिबवेवाडी, अप्पर डेपो परिसरातील ओसवाल दवाखान्यासमोरील ‘काळे अँड सन्स’ या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी पाहिले असता, सुमारे आठ हजार चौरस फुटांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मंडप साहित्य, कार्पेट, कापड व सजावटीचे साहित्य साठवलेले होते. या साहित्याने पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. परिसरात दाट वस्ती असल्याने आग इतरत्र पसरण्याचा धोका निर्माण झाला होता.

अग्निशमन दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी गोडाऊनजवळ उभा असलेला एक चारचाकी टेम्पो आणि सात दुचाकी वाहने आगीत जळून खाक झाली. तसेच घटनास्थळी असलेल्या चार ते पाच गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसून, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनीही मदतकार्यामध्ये सहकार्य केले.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची सात वाहने, तीन वॉटर टँकर तसेच महापालिकेच्या ११ टँकरची मदत घेण्यात आली. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे एक वाहनही मदतकार्यात सहभागी झाले होते.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईकनवरे, कैलास शिंदे यांच्यासह सुमारे ५० जवानांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
“आगीची भीषणता आणि नियंत्रण कक्षात येणारे सततचे फोन लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त अग्निशमन वाहने घटनास्थळी पाठविण्यात आली. परिसरात नागरी वस्ती आणि दुकाने असल्याने आग इतरत्र पसरणार नाही यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा धोका टळला,”
— देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
बापुराव चौधरी उपसंपादक