सुवर्णा कांचन मुख्य संपादक

शिंदवणे : हवेली तालुक्यातील शिंदवणे येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारावे आणि परिसरातील जीर्ण विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश आले आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच गणेश महाडिक यांनी चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित केले.

शिंदवणे परिसरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि जीर्ण विद्युत तारांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. शेतीसाठी पाणी उपलब्ध असूनही वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने गणेश महाडिक यांनी ग्रामस्थांना सोबत घेत बेमुदत उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनाला शिंदवणे ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली; मात्र ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलन सुरूच होते.

जीर्ण विद्युत तारांच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक आश्वासन


अखेर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. विद्युत उपकेंद्र उभारणीच्या मागणीसंदर्भात त्यांनी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हाधिकारी डुडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. विद्युत उपकेंद्र उभारणी आणि जीर्ण विद्युत तारांच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर गणेश महाडिक यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आश्वासनाची पूर्तता होण्याकडे लक्ष

उपोषण स्थगित झाले असले, तरी शिंदवणेकरांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष विद्युत उपकेंद्राच्या कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आमदारांच्या आश्वासनाची पूर्तता किती लवकर होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. या आंदोलनातून ग्रामस्थांची एकजूट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे लढण्याची ताकद पुन्हा एकदा दिसून आली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाडिक, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, वळतीचे सरपंच एल. बी. कुंजीर, शिंदवणेच्या सरपंच प्रमिला कचरू शितोळे, महावितरणचे शाखा अभियंता महेश धाडवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोरकर, माजी उपसरपंच संजय डोंबाळे, शिंदवणे विकास सोसायटीचे चेअरमन सचिन महाडिक, माजी सरपंच मनिषा आण्णासाहेब महाडिक, ज्योती दत्तात्रय महाडिक, सारिका महाडिक, शोभा आबासाहेब महाडिक, रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तानाजी महाडिक यांच्यासह बाळासाहेब कुंजीर, भुजंग महाडिक, नानासाहेब महाडिक, ॲड. रमेश महाडिक, दत्तात्रय महाडिक, अशोक कांबळे, भाऊसाहेब कुंजीर, जितेंद्र कुंजीर, विश्वास महाडिक, रामभाऊ महाडिक आदी उपस्थित होते. ग्रामस्थ आणि महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *