पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम दयानंद सुर्यवंशी (वय १९, रा. बोरीऐंदी, ता. दौड, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत कृष्णा दयानंद सुर्यवंशी (वय २०) यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेच्या दिवशी विक्रम हा आपल्या भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी आला होता. त्यानंतर तो अॅक्टिव्हा (एमएच २४ बीझेड ८३५६) दुचाकीवरून बोरीऐंदीच्या दिशेने निघाला. सोरतापवाडी फाट्याजवळ पुणे–सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोरतापवाडीच्या दिशेने येणाऱ्या एमएच १२ वायक्यू ५७९७ क्रमांकाच्या हायवा ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात विक्रमच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी सुनिल जगन्नाथ शिंगटे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार भोसले करीत आहेत.