बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी येथे भव्य जयंती महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्यात आकर्षक विद्युत रोषणाई, दमदार स्पीकर शो आणि भीमगीतांनी परिसर भारावून गेला. या उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भीमगीतांच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली आणि नागरिकांमध्ये आनंदाची लहर पसरली.

या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, अविनाश कदम, कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी क्रेनच्या सहाय्याने तब्बल ३० फूट उंचीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी बोलताना उमपहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे दरवर्षी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या दिमाखात विविध सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. यंदा  बाबसाहेबांनी केलेलल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी तर महात्मा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष आहे.

या निमित्ताने महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे, महात्मा फुले पुणे महापालिकेचे सदस्य होते यामुळे याला विशेष महत्व आहे. या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन वाडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले. 

संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण सहभाग यामुळे बोपोडीतील जयंती महोत्सवाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *