बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : भारत-अमेरिका कराराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने छेडलेल्या “शेतकरी न्याय सत्याग्रह” आंदोलनाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, केंद्र सरकारविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर थेट घाला असल्याचा आरोप करत, तो तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष लहू निवंगूने यांच्यासह युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, वीरधवल गाडे, विश्वजीत जाधव, जिल्हाध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांनी केंद्र सरकारच्या तथाकथित “किसान ट्रेड डील”वर जोरदार हल्लाबोल केला. “शेतकऱ्यांना न्याय देण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कर्जमाफी नाही, हमीभाव नाही, आणि त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ही परिस्थिती असह्य असून आता युवक रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” असा संतप्त सूर त्यांनी व्यक्त केला.

“शेतकरी वाचवा, युवक वाचवा, भारत वाचवा” हा नारा देत गावागावातून युवकांना एकत्र करून आंदोलन अधिक व्यापक करण्याची रणनीती आखली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार, असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *