
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयुष मंत्रालयाने दिलेल्या “योगा फॉर हेल्दी एजिंग” या थीमनुसार निसर्गोपचार आश्रम, उरुळी कांचन यांनी महिनाभर व्यापक जनजागृती अभियान राबवून योगाचा प्रतिबंधात्मक व जीवनशैली आधारित आरोग्यदृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविला. या अभियानातून १८ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधण्यात आली.

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन योगाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आश्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. योग प्रसारासाठी आश्रमाने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आंतर-मंत्रालयीन बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय व जागतिक स्तरावर योगाचा प्रसार अधिक प्रभावीपणे कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानादरम्यान एकूण १६ विविध योग व आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ताय ची, हस्त योग, कर्मचारी वर्गासाठी चेअर योग, आरएसबी समूहासाठी डेस्कटॉप योग, सात दिवसीय व्याख्यानमाला तसेच साउंड मेडिटेशन सत्रांचा समावेश होता.
दौंड, पेठ, तांबे वस्ती, एसआरसी केमिकल्स, बोरीआंडी, जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव, ग्लोबल व्हिजन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (वडेबोलाई), एंजल स्कूल, महात्मा गांधी स्कूल, अस्मिता इंग्लिश मीडियम स्कूल, सायरस पूनावाला स्कूल, उन्नती कन्याशाळा, स्वामी विवेकानंद स्कूल तसेच श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथे योग शिबिरे व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

या सर्व उपक्रमांचा समारोप २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘योग संगम’ या भव्य कार्यक्रमाने झाला. संपूर्ण अभियानाचे समन्वयन डॉ. समृद्धी व्यास यांनी केले. डॉ. भगवती मुखेडकर, जलींदर वाडेकर, तुषार जगदाळे आणि राहुल मेमाणे या योगाचार्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमात बोलताना आश्रमाचे संचालक व विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देविकार यांनी निरोगी वृद्धत्वासाठी योगाचे वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नियमित व साधा योगाभ्यासही आरोग्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो, असे सांगत त्यांनी ‘योग ३६५’ ही संकल्पना स्वीकारण्याचे आवाहन केले.

या उपक्रमांना डॉ. अमेय पुष्पराज व वैद्यकीय टीमचे सहकार्य लाभले. तसेच एचआर विभागाचे शंकर चौधरी आणि प्रशासकीय अधिकारी सतीश सोनामणे यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे यांनी संपूर्ण टीमला प्रोत्साहन देत मानसिक आरोग्याच्या जपणुकीवर विशेष भर दिला.
याच वेळी निसर्गोपचार आश्रम आणि डायटॉस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नो गॅस डे’ या नव्या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली. दर महिन्याला किमान दोन दिवस गॅसचा वापर टाळून नैसर्गिक व न शिजवलेला आहार घेण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांना क्यूआर कोड अथवा आश्रमाच्या संकेतस्थळाद्वारे संकल्प नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फळे, भाज्या व पौष्टिक पदार्थांवर आधारित आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पाककृतीही यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या व्यापक अभियानातून योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे, हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आश्रमाला यश आले.
बापुराव चौधरी उपसंपादक