
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम आणि आनंदवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज-५ (औतडवाडी-हांडेवाडी) आणि न्याती काउंटी येथे शुक्रवारी (ता. ५) भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थी, निसर्गप्रेमी नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर आशिष ठाकरे यांनी यावेळी बोलताना, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक तापमानवाढ, वाढता उष्णतेचा कडाका आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधींचा ऱ्हास या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत सुमारे ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, पुढील तीन वर्षे या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी दिली.

आनंदवन फाउंडेशनचे विशाल पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आनंदवन फेज-१ ते फेज-७ पर्यंत झालेल्या विस्ताराची माहिती दिली. युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, गेल्या तीन वर्षांपासून कळसुबाईच्या पायथ्याशी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदा आनंदवन फेज-५ येथे ही मोहीम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक पर्यावरण दिनाचा हा उपक्रम केवळ औपचारिकता नसून समाजहितासाठी राबविण्यात येणारा लोकसहभागाचा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आनंदवन फाउंडेशनचे प्रवीणकुमार आनंद, रमेश नर्यानी, भूपेश शर्मा तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ. समीर ननावरे, डॉ. पुस्तके, डॉ. पाटील, डॉ. वाळके आदी उपस्थित होते. इंडियन डायस्पोराचे रजत कुमार, झेंटिव्हाचे श्री. पुरोहित, तसेच दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डीपीएस स्कूल आणि ग्रेस स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नोबेल हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी डॉ. संजय पठारे, हेल्थ केअर असोसिएशनचे धनंजय कणसे, सिद्धू चव्हाण, हृषीकेश शेळके, डॉ. भूषण केदारी, श्री. अडसूळ, संघर्ष अकॅडमी (उरळी कांचन), वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनीही या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभाग घेतला.

या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसराच्या हरितीकरणाला चालना मिळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील विविध घटक एकत्र आल्याचे चित्र यानिमित्त पाहायला मिळाले.
बापुराव चौधरी उपसंपादक
