सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष सक्षम भूमिका घेत नसून, राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेला विरोधी पक्ष महापालिकेतही भाजपचीच ‘बी टीम’ म्हणून काम करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केली.

पिंपरी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, उपशहरप्रमुख अमोल निकम, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, उपशहरप्रमुख राजाराम कुदळे, पार्थ गुरव, बाळासाहेब जम, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, उपजिल्हा संघटिका वैभवी घोडके, कल्पना शेटे व विभाग संघटिका बेबी सय्यद उपस्थित होते.

तत्पूर्वी, शहर शिवसेनेच्या वतीने चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नसरापूर आणि सहकारनगर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यात आला. या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच, या प्रकरणावर भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.
चेतन पवार म्हणाले, ‘‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षातून शिवसेनेची स्थापना केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांनी माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काम करणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘लवकरच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील जुन्या-नव्या शिवसैनिकांना एकत्रित करून नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल. त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिले जाईल.’’
पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्जबाजारी करणाऱ्या तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कारभाराची तसेच नुकत्याच उघड झालेल्या ५२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती घेऊन न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व नसले तरी कारभार आणि भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाचे प्रतिनिधी मंडळ नियुक्त केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षा, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, अतिक्रमण, कायदा व सुव्यवस्था आदी प्रश्नांवर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलने करेल आणि भाजप तसेच विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आणेल, असा इशाराही चेतन पवार यांनी दिला.

बापुराव चौधरी, उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *