सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन व विविध प्राधिकरणांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पुणे आरएमसी असोसिएशनतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर पुणे जिल्ह्यातील RMC उद्योगाचे कामकाज ९ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा असोसिएशनने केली.

जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) तसेच PMRDA यांनी RMC उद्योगासाठी व्यवहार्य व एकसमान मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यासाठी सहकार्य केल्याचे असोसिएशनने नमूद केले.

यावेळी NAREDCO, CREDAI, MBVA, BAI, PESA, CCPA तसेच ICI आणि ISSE या उद्योग संघटनांचेही विशेष आभार मानण्यात आले.
तसेच प्रेस, मीडिया प्रतिनिधी, पुणेकर नागरिक आणि सर्व हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील स्थानिक व राष्ट्रीय स्तरावरील RMC प्लांट मालकांनी दाखविलेली एकजूट, शिस्त आणि संयम कौतुकास्पद असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
नियमांचे पालन करण्याची ग्वाही
असोसिएशनच्या अंतर्गत बैठकीत ३०० हून अधिक सदस्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी, PMC, वाहतूक पोलीस आणि MPCB यांनी घालून दिलेल्या सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली.
नागरिकांसाठी टोल-फ्री हेल्पलाइन
सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार उद्योग पद्धतीसाठी पुणे आरएमसी असोसिएशनतर्फे लवकरच टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. ट्रान्झिट मिक्सरकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, धोकादायक वाहनचालक, प्रदूषण किंवा RMC प्रकल्पांमुळे नागरिकांना होणारा त्रास यासंदर्भातील तक्रारी नागरिकांना या हेल्पलाइनवर नोंदविता येणार आहेत. प्राप्त तक्रारींवर संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने आवश्यक कारवाई केली जाईल, असेही असोसिएशनने स्पष्ट केले.
‘आम्ही समस्या नाही, उपायाचा भाग’
“जगभरात पाण्यानंतर काँक्रीट हा सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ असून तो अत्यावश्यक व लवकर खराब होणारा आहे. त्यामुळे RMC उद्योग हा समस्या नसून शाश्वत बांधकाम क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही समस्या नाही, आम्ही उपायाचा भाग आहोत,” असे पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक