बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे, ता. ६ : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबिर श्रीराम मंदिर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडले.

या शिबिरात एकूण १२६ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७ जणांना चष्म्यांची गरज असल्याचे निदर्शनास आले, तर १७ रुग्णांनी पुढील शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. अनुभवी नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोतीबिंदू तसेच इतर नेत्रविकारांचे निदान करून संबंधित रुग्णांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची सोयही सुलभ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ ५८०० रुपयांत केली जाणार असून, त्यामध्ये ७०० रुपयांचा जेवण खर्च समाविष्ट आहे. तसेच बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून, रुग्णांना फक्त ७०० रुपये जेवण खर्च द्यावा लागणार आहे.
याशिवाय, उत्कृष्ट दर्जाचे चष्मे केवळ १२० रुपयांत उपलब्ध करून देण्याची सुविधाही शिबिरात देण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही या सेवांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.

बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे संयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नेत्रविकारांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मोतीबिंदूसारख्या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात आणि दृष्टी गमावण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा मोफत शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बलदोटा परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *