बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : लोणी काळभोर परिसरात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मंगळवारी दुपारी मोठी कारवाई करत अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल ४९० लिटर हातभट्टी दारू आणि सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरातील मोगले वस्ती जवळील कॅनॉल परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता काही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत शिवाजी सुभाष फंड (२७) आणि सागर प्रकाश काळभोर (२८) यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळी तपासणीदरम्यान पत्र्याच्या घरात प्लास्टिकच्या ३५ लिटर क्षमतेच्या ८३ कॅनपैकी १४ कॅन दारूने भरलेले आढळले. तसेच ३०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक बॅरलही जप्त करण्यात आला. पंचासमक्ष नमुने घेऊन उर्वरित दारू नष्ट करण्यात आली.
प्राथमिक तपासात ही दारू बाहेरून आणून स्थानिक पातळीवर विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई), ६६, ८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, महेश करे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अशोक गिरी, सचिन सोनवणे आदींनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.