सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ व पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या रविंद्र कला मंदिर येथे आठवे कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, अभिनेते व सुप्रसिद्ध कवी श्री सिताराम नरके हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव श्री सोपान (बापू) कांचन, विश्वस्त श्री महादेव कांचन, श्री राजाराम कांचन, ज्येष्ठ साहित्यिक श्री सूर्यकांत नामुगडे, शिक्षण व क्रीडा समिती जि.प. पुणे सदस्य सौ. सुरेखा हरगुडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री भरत भोसले, कवी व संगीतकार श्री सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतासह अभंग, गवळण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच मराठी व हिंदी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. संस्कृती अंधारे, सोनाली सुकाळ, संकेत खंडागळे, आदित्य लोखंडे, वैष्णवी साळुंखे, आरोही साळुंखे, श्रीशा काकडे, काळूराम जाधव, सुयश घनवट व हर्षद बोबडे या विद्यार्थ्यांनी गायन, वादन व संगीत कलेचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित कवींनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. तसेच संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री शिवराज साने यांना “संगीत रत्न” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, आरोग्य जनजागृती व हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक विषयांवर लोकगीते, भारुडे आणि महापुरुषांच्या कार्याचा गीतातून गौरव करत समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी सातत्याने केले असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे जिल्हाध्यक्ष तथा पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष श्री सुरेश वाळेकर यांनी केले. सूत्रसंचालन उमाकांत अदमाने यांनी केले.
बापुराव चौधरी उपसंपादक