सुवर्णा कांचन, मुख्य संपादक
पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे एस.टी. थांबा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना हवेली तालुका प्रमुख स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी विभागीय मुख्य अधिकारी अरुण भगतसिंग सिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर उपस्थित होते.

कुंजीरवाडी हे विस्ताराने मोठे तसेच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे गाव असून, राज्यातील विविध भागांतील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. विशेषतः सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, अहिल्यानगर तसेच मराठवाडा व विदर्भातील अनेक कुटुंबे रोजगार, व्यवसाय आणि उदरनिर्वाहासाठी कुंजीरवाडीत स्थायिक झाली आहेत.

मात्र, गावात एस.टी. थांबा नसल्याने नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि भाविकांना गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी गैरसोय होत असल्याचेही सांगण्यात आले.
कुंजीरवाडीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर दुसरा एस.टी. थांबा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
सरकारी दवाखान्याजवळ एस.टी. थांबा सुरू झाल्यास विद्यार्थी, महिला, कामगार, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे स्वप्नील कुंजीर पाटील यांनी सांगितले.
गावाची वाढती लोकसंख्या आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बापुराव चौधरी, उपसंपादक