सुवर्णा कांचन मुख्य संपादक

जातेगाव बुद्रुक : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रीडा क्षेत्रातील सहभाग महत्त्वाचा असून, खेळातून शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना आणि खिलाडूवृत्तीची जडणघडण होते, असे प्रतिपादन जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांच्या हस्ते उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘क्रीडा हा केवळ मनोरंजन किंवा शारीरिक तंदुरुस्तीचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळाच्या मैदानावर विजय-पराजयाला सामोरे जाताना संयम, जिद्द, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयाचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल करावे.’’

यावेळी श्री संभाजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक स्पर्धांमधील सहभागाबाबत मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंनी लहान वयापासून सातत्यपूर्ण सराव, शिस्त, जिद्द आणि कठोर परिश्रम यांना महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूचे सर्वोच्च स्वप्न असू शकते. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


क्रीडा सप्ताहानिमित्त महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रा. बांगर, प्रा. उबाळे आदी उपस्थित होते. प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार डॉ. विजय गायकवाड यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *