बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : सध्याच्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कुटुंबव्यवस्था उध्वस्त होण्याचे प्रसंग मोठ्या प्रमाणावर दाखविले जात असून त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत आहे. भविष्यातही अशाच प्रवृत्तीच्या मालिका सुरू राहिल्यास कुटुंबव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी दिला.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भवानी पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बाल उद्यान येथे १५ ते १९ एप्रिलदरम्यान आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाले.

पवार म्हणाले, पूर्वी चित्रपट आणि मालिकांमधून समाजप्रबोधनाचे कार्य होत असे. मात्र सध्या नकारात्मकता आणि कौटुंबिक विघटनावर आधारित कथानकांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे विशेषतः महिलांवर आणि कुटुंबसंस्थेवर परिणाम होताना दिसतो. निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी याबाबत आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योगपती राजकुमार चोरडिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, लेखक राजन मोहाडीकर, विश्वस्त जगन्नाथ लडकत, गायक जितेंद्र भुरूक आणि कलावंत शिवराज वायचळ यांचा सन्मान करण्यात आला.

अभिनेते मोहन जोशी यांनी सन्मानित व्यक्तींना शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे समाजकार्यातील प्रेरणा वाढते, असे सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी महोत्सवाची ३१ वर्षांची परंपरा सांगून सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमास अभिनेते प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, संस्कृती बालगुडे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *