बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारतर्फे देशव्यापी स्मरणोत्सव साजरा करण्यात येणार असून या उपक्रमासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ११ मार्च २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १२६ सदस्यांची ही समिती स्थापन करण्यात आली असून १३ एप्रिल रोजी ती प्रसिद्ध करण्यात आली. या समितीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, फुले दाम्पत्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. कोल्हे निर्मित ‘मी सावित्रीबाई फुले’ ही मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत असून मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्यांची समितीवर झालेली नियुक्ती हा एक उल्लेखनीय योगायोग मानला जात आहे.

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२८ या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय, समानता आणि सशक्तीकरण यांसारख्या फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि पुनरुज्जीवन करणे हा या स्मरणोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्कृती मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीवर काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार तरुण पिढीत अधिक प्रभावीपणे करण्यासाठी या जबाबदारीचा उपयोग होईल.”

फुले दाम्पत्याचा अभिमानास्पद इतिहास अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी या नियुक्तीमुळे डॉ. कोल्हे यांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *