पुणे : पाषाण–औंध परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. राजभवन रोड (सद्य: लोकभवन रोड) या महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून या कामाला गती मिळणार आहे.

या संदर्भात आज अतिरिक्त आयुक्त दिवटे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या पोलीस विभागाच्या तीन इमारतींचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला. आवश्यक परवानग्या उपलब्ध असूनही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या चर्चेनंतर अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने दखल घेत पुढील काही महिन्यांत संबंधित पोलीस इमारतींचे स्थलांतर पूर्ण करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

राजभवन (लोकभवन) रस्ता हा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असल्याने रुंदीकरणानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही या निर्णयामुळे चालना मिळणार असून भविष्यात संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले.