पुणे : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) चालना देण्यासाठी Walmart Vriddhi आणि Maharashtra Directorate of Industries यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. Ideas to Impact Foundation यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून १ एप्रिल रोजी मुंबई येथे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या भागीदारीचा उद्देश राज्यातील एमएसएमईंना डिजिटल शिक्षण, व्यवसाय साधने आणि बाजारपेठेतील प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे उद्योजकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यास मदत होणार आहे.

२०२८ पर्यंत भारतातील एक लाख एमएसएमईंना सक्षम करण्याच्या वॉलमार्ट वृद्धीच्या ध्येयातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या उपक्रमांतर्गत वस्त्रोद्योग, हस्तकला, कृषी प्रक्रिया, चामड्याच्या वस्तू, तयार कपडे, रेशीम, फर्निचर, दागिने आदी प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सुरुवातीला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होईल. जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येणार आहे.

राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांनी एमएसएमई हे राज्याच्या आर्थिक प्रगतीचे प्रमुख घटक असल्याचे सांगितले. तर वॉलमार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन फ्रेमस्टॅड यांनी डिजिटल साधने आणि प्रशिक्षणाद्वारे उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल, असे नमूद केले.

राज्यातील ‘ऑनलाईन बेचो’ आणि ‘इकोसर्व्ह इंडिया’ यांसारख्या उद्योगांनी या उपक्रमाचा लाभ घेत यश मिळवले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत देशातील ७० हजारांहून अधिक एमएसएमईंना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *