
बापुराव चौधरी, उपसंपादक
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित, स्थानिक समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील दि. १९/४/२०२६ रोजी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. स्नेहा बुरगुल यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या गेल्या तीन वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदवी नंतरच्या विविध संधींचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि महाविद्यालयाची ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने तृप्ती जोशी आणि श्रुती काळभोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील दिवस, शिक्षकांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन आणि मित्र-मैत्रिणींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी भावूक झाले होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी केला. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवीधर न होता सुसंस्कृत नागरिक होणे गरजेचे आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही आयुष्यातील कोणत्याही संकटावर मात करू शकता.” संस्थेचे ब्रीदवाक्य ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार’ डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी बडदे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. गणेश हजारे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या समारंभासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पोपहारानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
