बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : हवेली तालुक्यातील नायगाव येथील प्रकाश बाबू सगर यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर पुणे शहर पोलिस दलात निवड मिळवत गावाचा मान उंचावला आहे. २०१८ पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अखेर २०२६ मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

पोलिस भरती प्रक्रियेत गेल्या चार वर्षांत केवळ १-१ गुणांनी अपयश येत असतानाही प्रकाश सगर यांनी खचून न जाता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर यश मिळवले. त्यांच्या या जिद्दीमुळे आणि चिकाटीमुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रकाश सगर यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा म्हणजे आई-वडिलांचे निधन होय. या कठीण परिस्थितीत त्यांचे मोठे भाऊ वैभव सगर यांनी दिलेला आधार आणि दाखवलेला विश्वास त्यांच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरला. प्रकाश यांनीही आपल्या यशाचे श्रेय मोठे भाऊ वैभवजी सगर यांनाच दिले आहे.

या यशानिमित्त नायगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश सगर यांचा सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी त्यांच्या परिश्रमांचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रकाश सगर यांचे यश प्रेरणादायी ठरत असून, सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *