बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : हवेली तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावागावात ‘जलतारा’ प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे मत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी व्यक्त केले.

हवेली पंचायत समितीत ‘जलतारा’ अभियानाचा विशेष आढावा बैठक जलतज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक गावांतील विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी अनेक ठिकाणी नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर ‘जलतारा’ प्रकल्प प्रभावी उपाय ठरू शकतो, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

‘जलतारा’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश भूजल पुनर्भरण करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे हा आहे. या प्रणालीमध्ये जमिनीच्या उतार भागात सुमारे ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ६ फूट खोल खड्डा खोदून त्यात दगड व गोटे भरले जातात. वरचा काही भाग रिकामा ठेवला जातो, ज्यामुळे पावसाचे पाणी सहज साचून जमिनीत झिरपते आणि भूजल पातळीत वाढ होते, अशी माहिती डॉ. वायाळ यांनी दिली.
पुणे शहराच्या जवळ असूनही हवेली तालुक्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. ‘जलतारा’ योजना राबविल्यास भूजल पुनर्भरण, सिंचन सुधारणा आणि शेती उत्पादन वाढीस मदत होणार आहे. यामुळे भूजल पातळीत १० ते १५ फुटांची वाढ होऊ शकते. तसेच अतिवृष्टीत पाणी साचण्याची समस्या कमी होऊन पिकांचे संरक्षण होण्यास मदत होते.
सदर प्रकल्पाला शासनस्तरावर मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, तोपर्यंत हवेली तालुक्यात सामाजिक संस्था, CSR कंपन्या आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याचा विचार पंचायत समितीचा आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाई दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन युवराज काकडे यांनी केले.
या बैठकीस उपसभापती विद्या गायकवाड, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सदस्य रुपाली कोंडे, कोमल आव्हाळे, शितल कांबळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पंचायत समिती सदस्य युवराज वांजळे, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमा मुरकुटे, कोमल कांबळे, राणी वाळके यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी व गावोगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.