बापुराव चौधरी, उपसंपादक

नागपूर : नागपूर शहर पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील सातव्या क्रमांकाचे उंच व अत्यंत कठीण मानले जाणारे धौलागिरी पर्वत (८,१६७ मीटर) शिखर यशस्वीरीत्या सर करून अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातून धौलागिरी सर करणारे ते पहिले अधिकारी ठरले असून, पोलिस दलाकडून ही मोहीम प्रथमच यशस्वी झाली आहे.

या पराक्रमामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ननवरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवाजी ननवरे यांनी यापूर्वीही जगातील अनेक अत्युच्च व आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. त्यामध्ये माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६ मीटर), माउंट लोहत्से (८,५१६ मीटर), माउंट मकालू (८,४८५ मीटर) आणि माउंट मनास्लू (८,१६३ मीटर) यांचा समावेश आहे. या सलग यशामुळे त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य गिर्यारोहकांमध्ये घेतले जात आहे.

धौलागिरी : कठीणतेची खरी परीक्षा
धौलागिरी शिखर हे गिर्यारोहण क्षेत्रात अत्यंत कठीण मानले जाते. तीव्र थंडी, कमी ऑक्सिजन, हिमवादळे, खडतर चढ-उतार आणि जीवघेण्या हिमफटी यामुळे ही मोहीम धोकादायक ठरते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ननवरे यांनी अपार धैर्य, चिकाटी आणि अचूक नियोजनाच्या जोरावर यश मिळवले.

कर्तव्य आणि साहस यांचा संगम
पोलीस सेवेत जबाबदाऱ्या पार पाडताना गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी करणे हे अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या यशामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच तरुण पिढीत साहस आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण होत आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
शिवाजी ननवरे यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. “जिद्द, धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणतेही शिखर गाठता येते,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *