बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : “दूध आणि मांस एकाच प्राण्याकडून येते” हा संदेश देत पुण्यातील तरुणाई ‘पृथ्वी दिना’च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरली. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर चित्रप्रदर्शन आणि निदर्शने करत दुग्धव्यवसायाच्या पर्यावरणीय व नैतिक परिणामांबाबत जनजागृती केली.

देशातील सुमारे २० शहरांत सुरू असलेल्या या मोहिमेद्वारे नागरिकांचे लक्ष दुग्धव्यवसायातील साखळी प्रक्रियेवर वेधण्यात येत आहे. दुभती जनावरे ‘अनुत्पादक’ ठरल्यानंतर त्यांची कत्तलखान्यांकडे होणारी वाटचाल आणि शेवटी मांस बाजारात होणारी विक्री याकडे लक्ष वेधत, दुग्ध व मांस उद्योग परस्परांशी निगडित असल्याचा मुद्दा कार्यकर्त्यांनी मांडला.

या वेळी हर्षल मगरे म्हणाले, “जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असताना भारत गोमांस निर्यातीतही आघाडीवर आहे. दुधासाठी वापरली जाणारी जनावरे अनुत्पादक झाल्यानंतर कत्तलखान्यात पाठवली जातात. त्यामुळे दुधाचा प्रत्येक घोट या साखळीला अप्रत्यक्ष पाठबळ देतो.”
पर्यावरणीय परिणामांवर भाष्य करत ट्विंकल ओसवाल यांनी सांगितले.

“भारतासारख्या पाणीटंचाईग्रस्त देशात एक लिटर दूध तयार करण्यासाठी सुमारे १०७८ लिटर पाणी लागते. तसेच पशुधनातून होणारे मिथेन उत्सर्जन हे जागतिक तापमानवाढीचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे आहाराच्या सवयींवर पुनर्विचार करणे गरजेचे आहे.”
प्रसाद सूर्यवंशी यांनीही दुग्धव्यवसायातील नैतिक प्रश्न अधोरेखित करत, “आपण सांस्कृतिकदृष्ट्या जनावरांची पूजा करतो; मात्र आपल्या उपभोगाच्या सवयी त्यांच्या शोषणाला चालना देतात,” असे नमूद केले.
पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा व शाश्वत शेती पद्धतींबाबत धोरणकर्त्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
दरम्यान, ‘पुणे ॲनिमल लिबरेशन’ या संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतून पशुपालनाच्या पर्यावरणीय आणि नैतिक परिणामांबाबत जनजागृती केली जात असून, अधिक शाश्वत व करुणामय अन्नव्यवस्थेकडे समाजाने वळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.