बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 3 मधील गोळेवस्ती परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. मागील तब्बल दोन महिन्यांपासून या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा इशारा देत परिस्थिती तापवली आहे.
दिगंबर निवृत्ती मोहिते, आबासाहेब दशरथ चव्हाण, अशोक दिलीप चव्हाण, प्रथम सोमनाथ गायकवाड, निहाल संजय कदम, धनराज संतोष जाधव आणि ऋषिकेश भारत चांदणे या नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करून संतप्त भूमिका मांडली आहे.

“ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होत असताना अचानक दोन महिन्यांपासून तो पूर्णपणे बंद आहे. पाणीपुरवठ्याची विहीर कोरडी पडली आहे. नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे,” असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

गोळेवस्तीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. “सरासरी एका कुटुंबाला किमान एक टँकर पाणी आवश्यक असताना आम्हाला थेंबथेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

“अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच केले नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे,” असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

दरम्यान, ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा काढू.” या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून आता ग्रामपंचायत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणी हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना अशा प्रकारे वंचित ठेवणे हा प्रशासनाचा मोठा अपयश मानले जात आहे. आता तरी ग्रामपंचायत जागी होऊन तातडीने उपाययोजना करणार का, की नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *