बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : मुळा–मुठा नदीतील वाढते प्रदूषण, जलपर्णीचा फैलाव व मच्छरांचा उद्रेक यामुळे नागरिक व जनावरांना होत असलेल्या त्रासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीकाठच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची भेट घेतली. या वेळी हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते उपस्थित होत्या.

या प्रश्नाच्या निषेधार्थ शिष्टमंडळाने १ मे या राष्ट्रीय दिनी जलपर्णीवर बसून उपोषणास सुरुवात केली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार तहसीलदार तृप्ती कोलते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले.

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासमवेत शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. या वेळी संबंधित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

शिष्टमंडळात हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल, ‘यशवंत’चे संचालक कुंडलिक थोरात, जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार, नायगावचे सरपंच राजेंद्र चौधरी, विवरीचे सरपंच वाल्मिक गोते, बोल्हाईमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बळी आबा गावडे, नांदूरचे विशाल नरेंद्र थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *