सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : श्रीक्षेत्र थेऊर नगरीत हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि मोगऱ्याच्या सुगंधी आरासीत पार पडलेल्या ‘वासंतिक चंदनउटी मोगरा आरास वारकरी भजन व संमेलन’ या भव्य धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. हवेली तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित या दिमाखदार सोहळ्यात थेऊर गावचे भूषण ह.भ.प. श्री आनंद महाराज विश्वनाथ तांबे यांना प्रतिष्ठेचा ‘हवेली वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

श्री महातारी माता मंदिर, श्रीक्षेत्र थेऊर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास हवेली तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या वारकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचशेहून अधिक टाळकरी, भजनी मंडळे, दिंडी प्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार, महिला दिंडी तसेच युवक वारकरी यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

अभंग, भजन, हरिनाम सप्ताह आणि कीर्तनांच्या सुरेल संगमातून भक्तिरसाचा अविस्मरणीय दरवळ अनुभवायला मिळाला.

संत तुकाराम महाराजांच्या “या रे या रे लहान थोर, याति भलते नारीनर” या अभंग ओळींप्रमाणे समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य, समता आणि भक्तीचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक ह.भ.प. श्री आनंद महाराज तांबे यांनी वारकरी संप्रदाय, संत साहित्य आणि समाजप्रबोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना ‘हवेली वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ बहाल करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आनंद महाराज तांबे यांनी कीर्तन, प्रवचन, गायन आणि संत वाङ्मय प्रचाराच्या माध्यमातून समाजात अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधनाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रभक्ती, स्त्री सन्मान आणि स्वच्छता अभियान यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने जनजागृती करून समाजमन घडविण्याचे कार्य केले आहे. वारकरी परंपरेचा संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

कार्यक्रमास सिद्ध सद्गुरु शांतिनाथजी महाराज, श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे आशीर्वाद लाभले. तसेच संत तुकाराम महाराज संस्थान देहू, धर्मवीर संभाजी महाराज मंदिर तुळापूर, श्रीराम मंदिर देवस्थान उरुळी कांचन, श्री वाघेश्वर महाराज मंदिर वाघोली यांसह विविध धार्मिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ आणि वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र थेऊर, चिंतामणी भजनी मंडळ आणि महातारी आई भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

वारकरी परंपरेचे जतन, संत विचारांचा प्रचार आणि समाजात बंधुभाव व ऐक्याची भावना दृढ करणारा हा सोहळा ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थित वारकरी बांधवांनी व्यक्त केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *