सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : डायल ११२ आपत्कालीन सेवेवर खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विजय रमेश जाधव (वय ३९, रा. सटवाई चौक, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल ऋषीकेष रभाजी रासकर यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वर विजय जाधव यांनी फोन करून इंदिरा नगर परिसरातील तुपे बिल्डिंग हॉस्टेलमध्ये मुलींवर मारहाण व अत्याचार सुरू असल्याची माहिती दिली होती.

सदर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, तेथे कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच संबंधित कॉलरला पोलिसांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्तीने जाणूनबुजून खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीने यापूर्वीदेखील डायल ११२ वर खोटे कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खरात करीत आहेत.

याबाबत माहिती देताना उरळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी ११२ डायल करून पोलिसांची दिशाभूत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *