सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याचे काम शहरात सुरू असून, प्रत्यक्ष प्रगणकांकडून घरभेटी देत माहिती संकलन करण्यात येत आहे. मात्र या कामाची प्रगती समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्याने आज सकाळी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे १६०० पर्यवेक्षकांची विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सुमारे ११ हजार प्रगणकांकडून शहरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेण्यात आला. घरभेटी व घरयादी माहिती संकलनाचे काम अपेक्षित गतीने होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कामात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच त्यावर उपाययोजना, तांत्रिक मार्गदर्शन आणि ऍपविषयक माहितीची पुन्हा उजळणी करण्यात आली. उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

बैठकीत सर्व चार्ज ऑफिसर्स आणि पर्यवेक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगणकांच्या कामावर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दररोजच्या प्रगतीचा आढावा घेऊन घरभेटी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

जनगणनेचे काम विहित कालमर्यादेत आणि अचूकतेने पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.

या प्रशिक्षण व आढावा बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच जनगणना संचालनालयाचे सहसंचालक राजेश भोसले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी पर्यवेक्षकांना जनगणनेच्या तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कामात कसूर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पालिकेकडून ‘जनगणना किट’ ताब्यात घेतल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू न करणारे किंवा प्रशिक्षणास अनुपस्थित राहणारे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची गंभीर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अशा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कर्तव्यावर हजर होऊन काम सुरू करावे, अन्यथा त्यांच्यावर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत शिस्तभंगविषयक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही प्रशासनाने दिला.

दरम्यान, पुणे शहरातील नागरिकांनी घरभेटीस येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *