
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कविरोधात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमुळे चर्चेत असलेले पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल आता थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महासभेत घेण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन देत तो एकमुखाने मंजूर केला.

महापालिकेच्या या गौरवाबद्दल विविध स्तरांतून पोलीस प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक माध्यमांवरही नागरिकांकडून या मोहिमेचे आणि पोलीस दलाच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली पोलीस प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान विविध भागांत धाडसत्र राबवून अनेक आरोपींना मकोका कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. तसेच कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने शहरातील व्यसनमुक्ती मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.

शहरातील अनेक भागांत अंमली पदार्थांची वाढती विक्री आणि सेवन याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे व्यसन हे पालकांसाठी गंभीर चिंतेचे कारण ठरत होते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने केवळ कारवाईवर भर न देता माहिती संकलन, गुप्त तपास आणि स्थानिक स्तरावरील समन्वयाच्या माध्यमातून व्यापक मोहीम उभारली.
या प्रयत्नांतून अनेक संशयितांचे जाळे उघडकीस आणण्यात यश आले असून, शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवरही मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे बोलले जात आहे.

महासभेतील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाच्या सामूहिक कामगिरीचे कौतुक केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे सदस्यांनी नमूद केले. अंमली पदार्थांविरोधातील कठोर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही सभागृहात सांगण्यात आले.

अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेबरोबरच विविध गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, संशयितांवर लक्ष आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या यशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून स्थानिक पोलिस कर्मचारी आणि तपास पथकातील सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
महासभेत मंजूर झालेला अभिनंदनाचा ठराव हा केवळ एका अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव नसून, शहराला व्यसनमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची अधिकृत दखल असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल उंचावले असून, भविष्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत असून, अशाच धडक कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
