
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर शेतकरी कुटुंबातील कन्या अँड. रेणुका मीरा गोविंदराव कांचन यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचन परिसरासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रेणुका या श्री. गोविंदराव किसन कांचन व सौ. मीरा गोविंदराव कांचन यांच्या कन्या आहेत. त्यांचे आई-वडील शेती व्यवसाय करत असून अत्यंत साध्या आणि कष्टकरी शेतकरी कुटुंबात त्यांचे संगोपन झाले. तीन बहिणींमध्ये वाढलेल्या रेणुका यांनी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड जोपासली. आर्थिक व सामाजिक आव्हानांचा सामना करत त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले.

पुणे विद्यापीठांतर्गत श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेजमध्ये त्यांनी विधी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यान त्यांनी अभ्यासाबरोबरच विविध कायदेविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

विशेष म्हणजे संपूर्ण नातेवाईकांमध्ये वकील होणाऱ्या त्या पहिल्या युवती ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या यशातून मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल विजयसिंह चोरघे यांच्यासह उरुळी कांचन येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रेणुका यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत असून भविष्यात न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक