सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सरहद लॉ स्कूल येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व विद्यार्थी विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (महाराष्ट्र राज्य, पुणे), विविध स्वयंसेवी संस्था तसेच सक्षम भारत अभियानांतर्गत एनएसएस व विद्यार्थी विकास मंडळ यांचा संयुक्त सहभाग होता. युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ला बळ देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाचे महत्त्व, पुनर्वसन केंद्रांची भूमिका आणि समाजाच्या सामूहिक जबाबदारीवर विशेष भर देण्यात आला.

अभियानाअंतर्गत आयोजित घोषवाक्य, पोस्टर, निबंध आणि रील स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याच्या विळख्यात अडकणारी तरुणाई” या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सर्जनशील सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची तसेच समाजात जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली.

संस्थेचे विश्वस्त अनुज नहार आणि प्राचार्या सत्यवती खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी कौशल बागुल, ग्रंथपाल मनीषा जगताप तसेच सहायक प्राध्यापक सागर घोळवे, स्वाती डिंबर, उत्कर्षा धुमाळ आणि आकाश गपाट उपस्थित होते.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून समाजात अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *