
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : राज्यात पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीची घटना समोर आल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे.

गव्हाणे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत नीट, एमपीएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा आणि आता टीईटी अशा अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

“एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि केंद्र व राज्यातील सरकार विरोधी पक्षांचे खासदार-आमदार फोडणे, सत्ता टिकविणे आणि राजकीय समीकरणे बदलण्यात व्यस्त आहे. मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या जबाबदारीत सरकार वारंवार अपयशी ठरत आहे. सत्ता टिकवण्यासाठी रात्रंदिवस रणनीती आखली जाते; पण विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी तितकीच तातडी का दिसत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थी आणि पालक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून परीक्षेची तयारी करतात. मात्र प्रत्येक वेळी पेपरफुटीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्याची खंत व्यक्त करत, या प्रकारामागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यासोबतच मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना स्पष्ट उत्तर द्यावे. केवळ चौकशीची घोषणा करून वेळकाढूपणा न करता दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रमुख मागण्या
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
पेपरफुटीत सहभागी असलेल्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी व जलदगती न्यायालयात खटले चालवावेत.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पुढील निर्णय जाहीर करावेत.
राज्यातील सर्व भरती व स्पर्धा परीक्षांसाठी सुरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि उत्तरदायी परीक्षा प्रणाली तातडीने लागू करावी.
वारंवार होणाऱ्या पेपरफुटी घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
बापुराव चौधरी उपसंपादक
