
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : संयुक्त महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री तथा सर्वाधिक काळ सलग ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. मात्र, राज्यातील महायुती सरकारला या दिवसाचा विसर पडल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

पुणे काँग्रेस भवन येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
तिवारी म्हणाले, “स्व. वसंतराव नाईक हे संयुक्त महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दूरदृष्टीचे नेते होते. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथील बंजारा समाजातून आलेल्या या ओबीसी नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने संधी देत सामाजिक समानतेचा पाया अधिक भक्कम केला.”

ते पुढे म्हणाले, “स्व. नाईक यांनी राज्यात हरितक्रांती आणि पंचायत राज व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी शेती उत्पादन आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेचा पाया त्यांनी रचला. दुग्धोत्पादनाला चालना देत श्वेतक्रांती घडवून आणली तसेच एमआयडीसीसारख्या संस्थांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला गती देऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.”

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे स्व. वसंतराव नाईक यांना सुमनांजली अर्पण करण्यात आली. राज्यात चांगला पाऊस होऊन सुगीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना करत राज्यातील बळीराजा आणि शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, राजाभाऊ कदम, गुलामहुसेन खान, भगवान कडू, ऋग्वेदिता सपकाळ, दीपक ओव्हाळ, शबीर शेख, धनंजय पाटील, हरिदास आडसुळ, देविदास लोणकर, दादासाहेब कामठे, राजेंद्र पडवळ, रोहित साळवे, आबा तरवडे, धनंजय दाभाडे, ॲड. फैय्याज शेख, प्रवीण करपे, रवी आरडे, अमित कांबळे आदी उपस्थित होते.
बापुराव चौधरी उपसंपादक