सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार १० जुलै २०२६ पर्यंत अंतिम वॉर्ड आरक्षण जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, हवेली तालुक्यातील मौजे थेऊर ग्रामपंचायतीचे अंतिम वॉर्ड आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्याने इच्छुक उमेदवार, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी ग्रामस्थ गणेश नारायण कुंजीर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची अंतिम वॉर्ड आरक्षण प्रक्रिया शासन निर्णय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियोजित मुदतीत पूर्ण झाली आहे. मात्र, थेऊर ग्रामपंचायतीचे अंतिम वॉर्ड आरक्षण अद्यापही जाहीर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुदत उलटूनही आरक्षण जाहीर न होण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, हवेली तसेच लोणी काळभोर येथील अपर तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कायदेशीर सूचना देऊन अंतिम वॉर्ड आरक्षण तातडीने जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


या प्रकरणाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार तसेच ग्रामविकास विभागाच्या सचिवांनाही पाठविण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी गणेश कुंजीर यांनी केली आहे.

दरम्यान, गावातील काही नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. काही इच्छुकांना अपेक्षेप्रमाणे वॉर्ड मिळाले नसल्याने प्रशासनावर विनाकारण दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. आरक्षण कोणत्याही स्वरूपाचे असले तरी निवडणूक लढविण्यास कायदेशीर अडचण नसते आणि अंतिम निर्णय मतदारच देत असतात, अशीही प्रतिक्रिया काही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


याच पार्श्वभूमीवर, अंतिम वॉर्ड आरक्षण वेळेत जाहीर न झाल्यास थेऊर ग्रामस्थांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा गणेश नारायण कुंजीर यांनी दिला आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *