सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पिंपरी : आजच्या धावपळीच्या आणि गोंधळलेल्या युगात प्रत्येक माणूस स्वतःलाच हरवून बसला आहे. अशा वेळी ‘स्व’मधला विठ्ठल शोधण्यासाठी ‘अंतर्नाद’ हे संगीत नाटक अनुभवणे आवश्यक आहे. या नाटकातून साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते. भक्तीरसाने ओथंबलेल्या प्रत्येक कलाकाराने रसिकांना वारीला न जाताही वारी अनुभवण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, नाटकातील एकही गीत कॉपी नसून सर्व गीते या प्रयोगासाठी नव्याने लिहिण्यात आली आहेत, ही अत्यंत नाविन्यपूर्ण बाब असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.
‘अंतर्नाद’ या भव्य संगीत नाटकाचा शुभारंभ प्रयोग शनिवारी (दि. १६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आळंदी ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे अध्यक्ष भावार्थ देखणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा मोरया थिएटरचे संस्थापक आणि ‘अंतर्नाद’चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात रसिकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भावार्थ देखणे म्हणाले, “अंतर्नाद पाहिल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक भारावून गेला आहे. भगवंतापुढे आपण फक्त नतमस्तक होतो. माझे वडील डॉ. रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे, ‘ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे पंढरपूरची वारी.’ ज्ञानी माणसांना ज्ञानाची, ध्यानी माणसांना ध्यानाची आणि सामान्य माणसांना समाधानाची उपासना असते. या अडीच तासांच्या प्रयोगानंतर जे समाधान मिळते, ते अन्य कशातूनही मिळू शकत नाही. प्रत्येक कलाकाराने प्रत्यक्ष भगवंत होऊन आम्हालाही नाचायला लावले, हेच ‘अंतर्नाद’चे वैशिष्ट्य आहे. या वारीत मला माझ्या वडिलांचे दर्शन झाले.”
निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी, “अंतर्नादची निर्मिती करताना मला माझी आई पुन्हा सापडल्यासारखे वाटले. ५१ कलाकारांच्या टीमने पहिलाच प्रयोग असूनही तो २५ व्या प्रयोगासारखा प्रभावी सादर केला,” असे सांगितले.
या संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग शुक्रवारी (दि. २२ मे) सायंकाळी सात वाजता हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात होणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तिकिटे उपलब्ध असून चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू असल्याची माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.
नाटकात पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरील गाणी, भूपाळी तसेच रॅप साँगचा समावेश करण्यात आला आहे. नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांचे असून गीते मुराद तांबोळी यांनी शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाशयोजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे, वेशभूषा वेदिका काळे यांनी सांभाळली असून सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक