
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा लोखंडी रॉडने वार करून खून केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला उरूळी कांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून ताब्यात घेतले. या घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी, भुमकर चौक, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनेश झांबरे आणि संबंधित तरुणी यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातून गुरुवारी (ता. ६) हिंजवडी येथील त्या दोघांच्या राहत्या ठिकाणी जाऊन आरोपीने लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर आरोपी त्याच्या एमएच-१३-ईके-५८२८ क्रमांकाच्या इर्टिगा कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात होता. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरूळी कांचन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांना तातडीने माहिती दिली.

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली उरूळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली.
नाकाबंदीदरम्यान भरधाव वेगाने येणारी इर्टिगा कार पोलिसांनी धाडसाने अडवून चालक दिनेश झांबरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आरोपीचा पाठलाग करत असलेले हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलिस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, नरेश बलसाने तसेच इतर पोलिस कर्मचारी उरूळी कांचन पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत उरूळी कांचन पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने नाकाबंदी करून आरोपीला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बापुराव चौधरी उपसंपादक
