बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे नुकतीच पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओपन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एंजल हायस्कूल, उरुळी कांचनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सात सुवर्णपदके पटकावली.

स्कूल गेम्स एज्युकेशन फेडरेशन इंडिया यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत एंजल हायस्कूलच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्ण यश मिळवले.

शिवराज निकम, श्रीतेज कांचन, रितेश चव्हाण, जुनेद आत्तार, सोहम शिंदे, विवेक पांडे आणि श्लोक कुंजीर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई करत उरुळी कांचनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

या यशामागे संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री तसेच विश्वस्त अविनाश शेलुकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. शाळेच्या प्राचार्या सौ. रीना देशमुख यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक शकील शेख यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. एंजल हायस्कूलच्या या यशामुळे उरुळी कांचन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *