बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : समाजपरिवर्तनाच्या वाटेवर दीपस्तंभ ठरलेले, धवल क्रांतीचे आद्य प्रवर्तक आणि प्रख्यात समाजसुधारक डॉ. मणिभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात प्रेरणेचा साज चढला.

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित या संस्थेच्या प्रांगणात विचारांची उजळणी आणि कृतज्ञतेची भावना यांचे सुरेख संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे विश्वस्त संभाजी कांचन यांच्या हस्ते डॉ. देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. आपल्या मनोगतात त्यांनी मणिभाई देसाई यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याचे अधोरेखित केले.

या प्रसंगी प्रा. धनाजी ठाकरे, प्रा. सुजाता गायकवाड, डॉ. समीर आबनावे, डॉ. निलेश शितोळे, प्रा. वैशाली चौधरी, प्रा. अनुप्रिता भोर, प्रा. शुभांगी धुमाळ-रानवडे, प्रा. मनाली नागवडे, प्रा. केतकी साळुंखे तसेच प्रदीप राजपूत यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. प्रेरणादायी वातावरण, उत्साहवर्धक सहभाग आणि विचारांची समृद्ध देवाणघेवाण यामुळे संपूर्ण कार्यक्रम भारावून गेला.

डॉ. मणिभाई देसाई यांच्या कार्याची जाणीव करून देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, तर उपस्थितांच्या मनात समाजकार्याची नवी उमेद जागवून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *