सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : मौजे कदमवाकवस्ती येथे शासकीय ओढ्याच्या खड्यात पडून मृत्यू झालेल्या दोन वर्षीय कु. सोहम लखन कसबे यांच्या कुटुंबीयांची पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मृत चिमुकल्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची विनंतीही काकडे यांनी केली. त्यावर आमदार कटके यांनी प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना दिल्याची माहिती देण्यात आली.

यानंतर सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांनी घटनास्थळासह संपूर्ण ओढ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ओढ्यालगत संरक्षक भिंत उभारणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविणे आणि संपूर्ण पालखीतळ परिसराचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही सभापती युवराज काकडे यांनी केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *