
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पिंपरी : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीतील पत्रकारांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलक पत्रकारांनी यावेळी केली.

आंदोलनात पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ, विजय जगताप आणि अनिल वडघुले यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारितेवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात भूमिका मांडली.

गोविंद वाकडे म्हणाले, “संजय दिना पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असून त्यांची हकालपट्टी करून राजीनामा घेण्यात यावा.”
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी, “माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवरील आघात आहे. राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा कमी होत असून आता पत्रकारांनाही लक्ष्य केले जात आहे. अशा प्रवृत्तीला पत्रकार योग्य उत्तर देतील,” असे सांगितले.

अविनाश चिलेकर यांनी अशा वक्तव्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला. संतोष मिश्रा म्हणाले, “प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला किंवा धमकीला न जुमानता आम्ही आमचे काम सुरूच ठेवू.”
बाळासाहेब ढसाळ यांनीही पत्रकारांवरील दबावाच्या प्रयत्नांचा निषेध करत अशा प्रवृत्तीला एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन केले.

या आंदोलनात मिलिंद कांबळे, अमोल काकडे, नरेश नातू, तुळशीदास शिंदे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे, विकास शिंदे, भानुदास हिवराळे, सुरज कसबे, विश्वजीत पोल्ले, पराग कुंकूलोळ यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते.
यावेळी भविष्यात पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
बापुराव चौधरी उपसंपादक
