
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. २६) सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच पोलिस उपायुक्त, परिमंडळ-४ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली.

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथून रॅलीला प्रारंभ झाला. मुकुंदराव आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक (कळस), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (कळस), आर अँड डी ई, विश्रांतवाडी चौक, धानोरी रोड, गोकुळनगर, भैरवनगर, भरत ढाबा, धानोरी जकात नाका, जाणता राजा चौक, गणपती चौक (मुंजाबा वस्ती), टिंगरेनगर लेन क्रमांक १३, एअरपोर्ट रोड, सावंत पेट्रोल पंप चौक, कॉमरझोन, अग्रसेन शाळा, आरटीओ, सापरस चौक, आदर्श इंदिरानगर मार्गे पुन्हा विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे रॅलीची सांगता झाली.

या रॅलीमध्ये ५२ दुचाकींसह महिला व पुरुष पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीस मित्र, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण १०० ते १२० जण या जनजागृती अभियानात सहभागी झाले होते.

अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देत नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही बाईक रॅली शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बापुराव चौधरी उपसंपादक