बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : मानवतेत प्रेम, समरसता आणि बंधुभाव जागविणाऱ्या संत निरंकारी मिशन तर्फे २४ एप्रिल २०२६ रोजी ‘मानव एकता दिवस’ उत्साहात साजरा केला जाणार आहे. बाबा गुरबचन सिंह जी यांच्या पावन स्मृतीनिमित्त आयोजित हा दिवस श्रद्धा, सेवा आणि एकत्वाचा संदेश देणारा ठरणार आहे.

सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने पुण्यातील विविध सत्संग भवनांमध्ये दिव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत श्रद्धाळू भक्तांना आध्यात्मिकतेचा अनुभव घेत एकत्वाची भावना दृढ करण्याची संधी मिळणार आहे.

या निमित्ताने संत निरंकारी सत्संग भवन, जय जवान नगर फॉरेस्ट पार्क तसेच काळेवाडी येथे सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमात वाय.सी.एम. रुग्णालय, ससून रुग्णालय आणि संत निरंकारी रक्तपेढीचे डॉक्टर सहभागी होणार आहेत.
या शिबिरांमध्ये हजारो श्रद्धाळू रक्तदान करून मानवसेवेचे अनमोल उदाहरण घालतील, अशी माहिती मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी दिली. रक्तदानामुळे गरजूंना जीवनदान मिळण्याबरोबरच दात्यांनाही आत्मिक समाधानाची अनुभूती मिळते, असे त्यांनी सांगितले.
हा दिवस चाचा प्रताप सिंह जी यांच्या स्मृतीलाही समर्पित असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवेच्या आदर्शातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘मानव एकता दिवस’ निमित्त आयोजित उपक्रमांमधून प्रेम, सेवा आणि सहअस्तित्वाचा संदेश अधिक बळकट होणार आहे.