बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. राहुरीमध्ये 56.20 टक्के तर बारामतीमध्ये 58.17 टक्के मतदानाची नोंद झाली.

दोन्ही मतदारसंघातील जागा अनुक्रमे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झाल्या होत्या.

‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राहुरी मतदारसंघात भाजपकडून दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे बंडखोर रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणुकीत होते.

सर्वेक्षणानुसार, अक्षय कर्डिले यांना सुमारे 1,42,500 (76%) मते मिळण्याची शक्यता असून गोविंद मोकाटे यांना 25,500 (14%) मते मिळू शकतात. इतर उमेदवारांना सुमारे 19,463 (10%) मते मिळण्याचा अंदाज आहे. कर्डिले यांचा तब्बल 1,17,000 मतांनी विजय होऊ शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या संभाव्य विजयामागे दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, विरोधकांकडे सक्षम उमेदवाराचा अभाव, स्थानिक नेत्यांचा प्रभाव, तसेच अपक्ष उमेदवारांमुळे झालेली मतांची विभागणी ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.

दरम्यान, बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, कोणत्याही मोठ्या पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता.

सर्वेक्षणानुसार, सुनेत्रा पवार यांना तब्बल 2,12,000 (95%) मते मिळण्याची शक्यता असून इतर सर्व उमेदवारांना मिळून केवळ 11,705 (5%) मते मिळू शकतात. त्यांचा विजय 2,07,000 मतांच्या प्रचंड फरकाने होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बारामतीत पवार कुटुंबीयांचा प्रभाव, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, प्रमुख नेत्यांचा प्रचार आणि विरोधकांचा अभाव या घटकांमुळे हा एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर काही प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांना दोन्ही मतदारसंघांत फायदा झाल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *