बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : प्रत्येक जिल्ह्यातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन नव्या रूपात साकारले असून, जागतिक दर्जाच्या प्रदर्शनांशी स्पर्धा करण्यास ते सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रदर्शनात सजावटीसाठी वापरलेले कंटेनर हे ‘कंटेनर ऑफ इंडिया’ संकल्पनेवर आधारित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२६ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांनी अर्थव्यवस्थेत सक्रिय भूमिका घेतल्यास देशाचा विकास अधिक वेगाने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमुळे महाराष्ट्रात बचत गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘उमेद’ आणि ‘मवीम’च्या माध्यमातून लाखो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

५० लाख ‘लखपती दीदी’; आता १ कोटीचे लक्ष्य
राज्यात आतापर्यंत ५० लाख महिलांनी ‘लखपती दीदी’चा टप्पा गाठला असून, लवकरच हा आकडा १ कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. यासाठी महिला बचत गटांना रोपवाटिका (नर्सरी) उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. झाडे लावणे आणि त्यांची निगा राखण्यासाठी आवश्यक खर्चही शासन उचलणार असल्याने महिलांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.

महिला बचत गटांसाठी ‘उमेद’ मॉल

ग्रामीण भागातील महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी २० जिल्ह्यांत ‘उमेद’ मॉल उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. उर्वरित १६ जिल्ह्यांतही पुढील पाच ते दहा वर्षांत प्रत्येक तालुक्यात असे मॉल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

५० हजार कोटींचे कर्ज; परतफेड शंभर टक्के
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगताना मंत्री गोरे म्हणाले की, राज्यात ६४ लाख कुटुंबे आणि ३४ हजार महिला बचत गट या चळवळीत सहभागी झाले आहेत. बचत गटांना वितरित केलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची महिलांनी एक रुपयाही न थकवता परतफेड केल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

‘१ कोटी लखपती दीदी’साठी प्रयत्न तीव्र
देशात ३ कोटी महिलांना ‘लखपती’ करण्याच्या संकल्पानुसार महाराष्ट्रात १ कोटी महिलांना या स्तरावर पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले जातील, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *