सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२६/प्र.क्र.९४/E-1722500/आस्था-८, दि. १३ जुलै २०२६ अन्वये, महसूल विभागामार्फत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

अप्पर तहसील कार्यालय, हवेली व पंचायत समिती, हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर शुक्रवारी (ता. ३१) सकाळी १० वाजता थेऊर येथील आशीर्वाद बँक्वेट हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिली.

या कार्यक्रमास पुणे जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी व आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच हवेली तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये घरकुल योजनेचा लाभ, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांग योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, रेशनिंग धान्य पुरवठा सुरू करणे, तुकडेबंदी नियमितीकरण, भूसंपादन कमी-जास्त पत्रके, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, अकृषिक कमी-जास्त पत्रके, ७/१२ उताऱ्यातील त्रुटींची दुरुस्ती, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करण्याची प्रकरणे, अकृषित तरतुदीनुसार सुधारणा, अधिमूल्य आकारणी व वसुली, मुख्यमंत्री शेत-पानंद रस्ते योजना, ई-मोजणीतील प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित फेरफार, अॅग्रीस्टॅक आयडी नोंदणी, एसआयआर अर्ज भरणे, ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टीसंदर्भातील समस्या, महावितरण विभागाशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विभागाच्या विविध योजना तसेच आरोग्यविषयक सेवांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

याशिवाय, यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र नागरिकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखलेही यावेळी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *