
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे: वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी उपक्रमासाठी साजरा करण्याचा आदर्श टिळेकरवाडी येथील संतोष सुखदेव राऊत यांनी घालून दिला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयास डिजिटल साऊंड सिस्टीम भेट दिली.

राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका सरचिटणीस, टिळेकरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत. भेट दिलेल्या साऊंड सिस्टीमचा उपयोग शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दैनंदिन परिपाठासाठी होणार आहे.

यावेळी राऊत म्हणाले, “वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात खरे समाधान आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले.”
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिके, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांसह महात्मा गांधी विद्यालय संघाचे विश्वस्त राजेंद्र तुळशीराम टिळेकर, कृषी अधिकारी संजय तुळशीराम टिळेकर, श्रीदत्त ट्रस्टचे उपाध्यक्ष आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, कृषी अधिकारी भोसेकर, प्रगतशील बागायतदार बाळासाहेब जांभुळकर व स्वयम राऊत उपस्थित होते. राऊत यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
बापुराव चौधरी उपसंपादक
