
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महात्मा गांधी सर्वोदय संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता फडके यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनातील भूमिका स्पष्ट केली. प्रमुख मार्गदर्शक प्रा. रवींद्र मुंढे यांनी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नव्याने वृक्षारोपण करण्याबरोबरच पूर्वी लावलेल्या वृक्षांना पाणी देत परिसर स्वच्छ केला.

कला विभागप्रमुख डॉ. समीर आबनावे, इतिहास विभागप्रमुख डॉ. अमोल बोत्रे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रणिता फडके, प्रा. रोहित बारवकर व समिती सदस्यांनी केले. विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा’चा संदेश देत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
बापुराव चौधरी उपसंपादक

