सुवर्णा कांचन मुख्य संपादक

जातेगाव बु. : येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित जिजामाता सीनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक संकुलात गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानिमित्त झालेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सर्जनशीलतेला चालना मिळावी, सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व प्रास्ताविकाने करण्यात आली. त्यानंतर ‘पास द पार्सल’, ‘अभिनय व ओळखा’, ‘बॉल टॉस इन बकेट’, प्रश्नमंजुषा, खाद्यपदार्थ स्टॉल, संगीत खुर्ची आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. विविध स्पर्धांमध्ये नंदकिशोर डोंगर, मोहित घुले, मुस्कान शेख, दिव्या गोपाळे, साहिल वाघोले, दीक्षा इंगवले, ऋतुजा पटेकर, ऋतुजा जाधव, सानवी साळुंखे, माधुरी गरजे आदी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या गणेशोत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल उमाप, उपाध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश बापू पवार, संस्थेचे सर्व विश्वस्त यांची प्रेरणा लाभली. मनोरंजनात्मक व बौद्धिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. रुपाली रासकर, समिती सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त सहभागामुळे शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव काळात उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *